नियतीला घडवितांना – पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती
पद्मविभूषण डॉ. संचेती यांनी २४ जुलै २०१८ रोजी आपला ८२ वा वाढदिवस साजरा केला.
डॉ. कांतीलाल हस्तीमल संचेती हे एक नाव नसून, एक संस्था आहे. असे क्वचितच लोकं
दिसतात जे केवळ परोपकारासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी ह्या जगात आहेत.
डॉ. संचेती हे व्यवसायाने अस्थिरोगतज्ञ. त्यांनी १९६५ साली पुण्यातील पहिला
अस्थिरोगतज्ञ होण्याचा मान मिळवला आणि आपली प्रक्टिस सुरु केली. या वर्षी ते आपल्या
सेवाभावी कार्याचे ५० वर्ष पूर्ण करीत आहेत. डॉ. संचेती म्हणतात कि कितीही मोठ्ठा
डॉक्टर असो, तो प्रक्टिसच करतो, परफेक्ट होत नाही. म्हणून त्यांनी कायमच ज्ञान
मिळवण्याची धडपड सुरु ठेवली. डॉ. संचेती मानतात कि ते अगदी साधारण बुद्धीचे विद्यार्थी
आहेत. परंतु त्यांच्यामध्ये कठोर परिश्रमाची अनोखी ताकद आहे. वैद्यकीय
महाविद्यालयात शिकत असताना जेव्हा त्यांचे सहकारी मित्र तासाभरात २० पाने वाचून
काढत, संचेती सरांची १० देखील होत नसे. पण ते ठरवून दुप्पट तिप्पट जास्त वेळ
अभ्यास करत आणि प्रगती करत. ह्यात त्यांना डॉ. कर्णिक आणि श्री. कुकडे
ह्यांच्यासारखे दिग्गज मित्र प्राप्त झाले ज्यांनी त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा
प्राप्त करून दिली. ह्याच बरोबर डॉ. मोदी, डॉ. ग्रांट, डॉ. तळवलकर आणि डॉ. कोयाजी सारख्या
आदर्शमुर्त्याही प्राप्त झाल्या आणि त्यांच्या ज्ञानाचा उजळा झाला. किंतु ह्या
गुरुमाउलींनी सर्वात मोठी दिलेली शिकवण म्हणजे चांगला डॉक्टर बनण्याबोरोबरच चांगला
माणूस बनणे जास्त महत्वाचे आहे.
डॉ. संचेती हे मुळात पुण्यातील एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेले. वडिलांचे
किराणामालाचे दुकान होते. त्यांच्याकडून त्यांना सतत परिश्रम आणि चोकस्पणाची
शिकवण मिळायची. पण त्याच बरोबर व्यवहार ज्ञान, मृदुलता आणि प्रामाणिकपणा देखील
शिकायला मिळाला. डॉ. संचेती सांगतात कि लहानपणी जेव्हा ते ग्राहकासाठी धान्याची
पुडी बनवत तेव्हा त्यांचे वडील ग्राहकाची परडी वजन काट्यावर पूर्ण खाली जाईस्तोवर
धान्य देत कारण ग्राहक हे देव असतो हीच त्यांची श्रद्धा. हीच शिकवण घेत डॉ.
संचेतींनी डॉक्टर झाल्यावर रुग्णसेवेला आयुष्य अर्पण केले. रुग्ण्नांची सेवा
म्हणजेच ईश्वर सेवा हाच त्यांचा ध्येय. डॉ. संचेती मानतात कि आपल्या रुग्णांनी
दिलेला आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. खास करून गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्ण. ते
सांगतात कि त्यांच्या बालपणी त्यांच्या आईच्या छोट्याशा शस्त्रक्रियेसाठी देखील
त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते. ह्याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला आणि
डॉक्टर झाल्यावर त्यांनी निश्चय केला कि
गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या सेवेसाठी आपले आयुष्य वहायचे. ते म्हणतात कि
पैसा तर येतच राहतो. पण रुग्णांकडून मिळणारा मान सम्मान आणि त्यांचा आशीर्वाद हीच
त्यांची खरी पुंजी आहे.
रुग्णांसाठी त्यांना वाटणारी करुणा आणि आस्था हेच त्यांचे मनोबल आहे.
महाराष्ट्रात पोलिओची साथ असतांना त्यांनी प्रचंड प्रमाणात मोफत पोलिओची शिबिरे
घेतली. दर महिन्यातून ५-६ वेळा ते स्वखर्चाने गावो गावी जात आणि पोलिओग्रस्त
रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करीत. ह्याचीच दखल घेत भारत सरकारने १९९१ मध्ये
आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री ने सम्मानित केले. ह्याने तर
त्यांची कार्यक्षमता जवळ जवळ दुप्पट झाली आणि गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या
सेवेसाठी त्यांनी स्वताला जास्तच वाहून घेतले. ह्याबद्दल २००३ साली त्यांना भारत
सरकारने आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आहे.
रुग्णसेवेचा जणूकाही डॉ. संचेतींनी ध्यासच घेतला होता. आपल्या देशात बर्याच
लोकांना गुडघेदुखी चा त्रास होतो आणि बर्याच वेळी गुडघे बदलून कृत्रिम सांधे
लावावे लागत. पण हे खूपच खर्चिक असत. ह्याव्यतिरिक्त हे सांधेरोपण केलेल्या
व्यक्तीला मांडी घालून किव्वा उपडी बसणे शक्य होत नसत. हीच अडचण लक्ष्यात घेऊन डॉ.
संचेतींनी कठोर संशोधनाने भारतीय जीवनशैली ला साधेशे कृत्रिम गुडघ्यांचा शोध
लावला. हे रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत देखील होऊ लागले. ह्यावरच न थांबता डॉ.
संचेती धातू ऐवजी सिरेमिक वर देखील प्रयोग करू लागले जेणेकरून अत्यंत कमी किमतीत
आणि दीर्घकाळ टिकणारे खुब्याचे कृत्रिम सांधे बनवणे शक्य होईल. त्यांच्या
रुग्णसेवेसाठी उचललेल्या पणाची भारत सरकारने दखल घेतली आणि २०१२ मध्ये पद्मविभूषण
पुरस्काराने त्यांना सम्मानित केले. भारतातील ते एकुलते एक अस्थिरोगतज्ञ आहेत
ज्यांना ह्या तीनही पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
डॉ. संचेतींचे म्हणणे आहे कि कामाचा किव्वा सेवेचा थकवा हाच मोठा शत्रू. ते
म्हणतात कि, मी रोजच सुट्टी आहे असा निश्चिंत राहतो आणि कधीही कामाचे दडपण अथवा
ताण घेत नाही. किंबहुना, मला कामामुळे आणि रुग्णासेवेमुळे नवीन उत्साह आणि चैतन्य
प्राप्त होते. ते कधीही आपल्या कर्तव्य पूर्तीला नाही म्हणत नाही. ते म्हणतात कि
माझे रुग्णाच माझी उर्जा आहेत. त्यामुळे मला कधीच त्यांचा कंटाळा येत नाही किव्वा
तेच तेच काम करतो आहे असे ही वाटत नाही. मी प्रत्येक वेळी रुग्णांसाठी नवीन विचार
धारणा आणि नवीन शास्त्र वापरतो जेणेकरून नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होऊन माझ्या
रुग्णांना लवकर आणि अधिक आराम मिळेल आणि त्यांचे जीवन पुन्हा नवीन प्रकारे उजळेल. खरच,
डॉ. संचेतींचा स्वभाव हा विशेषच आहे. स्वभावातील मृदुलता, कर्तव्याची जाणीव आणि
इतरांसाठीचा त्यांच्या मनातील आदर ह्या शिकण्याच्या बाबी आहेत. ते म्हणतात, माणसानी
कायम शिकतच राहिले पाहिजे. ज्ञान हे एक उत्तम मित्र असत.
डॉ. संचेती हे केवळ अस्थिरोगशास्त्रातच नाही तर इतर विषयात देखील तज्ञ आहेत. त्यांचा
वास्तुशास्त्र ह्या विषयातील आभ्यास अमाप आहे. खास करून हॉस्पिटलांमध्ये
वास्तुशास्त्रामुळे करता येणारे सुधार आणि नैसर्गिकरीत्या उर्जेचा वापर ह्या
विषयावर त्यांचा उत्तम अभ्यास आहे. ह्याच बरोबर त्यांना अर्थशास्त्र आणि कर भरणा
ह्यात सुद्धा खूप रुची आहे. ते म्हणतात कि प्रत्यक माणसाकडून भरपूर ज्ञान
मिळवण्यासारखे असते. केवळ आपल्या मनाची आणि मेंदूची दारे उघडी हवीत. आणि ह्याहून
महत्वाचे म्हणजे स्वतःचा आहंकर बाजूला सारून समोरच्याकडून शिकण्याची मनाची तयारी
देखील हवी. ते सांगतात कि त्यांना लोकांकडून नवीन नवीन माहिती घ्यायला आणि शिकायला
खूप आवडता. ते मानतात कि दुसऱ्यांचा सम्मान आणि आदर करूनच आपण मोठे होऊ शकतो. डॉ.
संचेती म्हणतात कि देवाने त्यांना जे गुण दिले आहेत, त्यात मृदूपणा, धैर्य,
एकनिष्ठता, कामावर श्रद्धा, आणि दुसऱ्यास मदतीस तत्परता ही त्यांना सर्वात मोठे
गुण वाटतात. आणि ते मन मोकळेपणाने आपल्या प्रगतीचे श्रेय आपल्या पत्नीला आणि
परिवाराला देतात. आपल्या सध्या जीवनाने, प्रेमाने आणि आत्मीयतेने ते खरोखरच
सर्वांचे मन जिंकून घेतात.
पण इतके प्राप्त करून देखील डॉ. संचेती अल्प संतुष्ट आहेत. ते सांगतात कि
त्यांच्या जवळ एक १९४८ ची सेकंड हेंड कार होती जी त्यांनी १९६८ मध्ये रु. २४००/-
ला विकत घेतली होती. तेव्हा देखील त्यांना आपल्याकडे सर्व सुख सोयी असल्याची भावना
होती. ते म्हणतात, मला आज जे काही प्राप्त झाले आहे ते केवळ परमेश्वराच्या
आशीर्वादानी आहे. त्यामुळेच मला दुसऱ्यांना देण्यात जास्त सुख वाटतं. ते म्हणतात
कि जोपर्यंत माझे हात पाय चालू आहेत, मी माझे रुग्ण सेवेचे कार्य सुरु ठेवीन.
आपल्यास प्राप्त झालेले ज्ञान डॉ. संचेती स्वतः जवळ ठेवत नाहीत तर त्याचे
ज्ञानार्जन करीत असतात. डॉ. संचेतींना सर्व डॉक्टर्स आपले गुरु मानतात. त्यांच्या
कडून शिकण्यासाठी केवळ पुण्यातूनच नाही तर अख्ख्या भारतातून आणि परदेशातून देखील
विद्यार्थी संचेती हॉस्पिटल मध्ये येतात. आणि सर्वात सुंदर म्हणजे डॉ. संचेती
त्यांना केवळ उत्तम सर्जन बनवत नाहीत तर सज्जन आणि निर्मल देखील बनवतात. आपल्या
गुरूंना केलेल्या वचनाचे पालन करीत सर्व शिकाऊ अस्थिरोगतज्ञांना चांगले मनुष्य
बनवतात. त्यांचे वर्ग सकाळी ६ वाजता सुरु होतात ते गुरुवंदना आणि ध्यानाने. प्रथम
स्वतः वर संस्कार, मग रुग्णांवर प्रेम आणि मग देवावर श्रद्धा ही त्यांची शिकवण
अदभूत आहे. ह्यानेच त्यांच्या बराच्याच विद्यार्थ्यांनी जगभरात भारताचे आणि संचेती
हॉस्पिटल चे नाव लौकिक केले आहे.
डॉ. संचेती म्हणतात, मी खूप समाधानी आहे. मी माझे सर्व वैभव देवाला समर्पित
केले आहे. त्यामुळे देवच माझी काळजी घेतो. म्हणून मला दुख:, उदासीनता आदी
गोष्टींचा त्रास होत नाही. ते म्हणतात कि मी इतका समाधानी आहे कि मला मृत्यूची
देखील आता भीती वाटत नाही. त्यांचे आता एकाच ध्येय आहे, जितकं आयुष्य आहे ते सुखाने,
समाधानाने, इतरांच्या सेवेसाठी आणि समाजाला काहीतरी उपयुक्त राहण्यासाठीच घालवायचे
आहे.
खरच, डॉ. संचेतींच्या या सेवाभावी, समंजस आणि लौकिक वृत्ती ला मनःपूर्वक प्रणाम.
डॉ. अपूर्व शिंपी