फिजिओथेरेपी म्हणजे काय?
आपलं
आरोग्य हे आपले सर्वोत्तम धन आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यवसाय
जोपासण्याच्या नादात आपण आपल्या ह्या आरोग्यस्वरूपी धनाकडे सर्वात जास्त
दुर्लक्ष्य करत आहोत. या आरोग्याला जोपासण्यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक
सर्वोत्तम उपचार पध्दती म्हणजेच फिजिओथेरेपी. फिजिओथेरेपी म्हणजेच भौतिक उपचार. या
विज्ञानात भौतिक शास्त्रातिल सिद्धांत मानवी शरीरासाठी योग्य रुपात वापरले जातात
जेणेकरून सारीराची क्रीयापाद्दती सुधारून कार्यक्षमता वाढते. फिजिओथेरेपीस्ट हे एक
वैद्यकीय तज्ञ असतात जे ह्या उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णांना बरे करतात. तसेच
सर्वसाधारण लोकांना सुद्धा व्यायामाचे महत्व आणि प्रकार दाखवून आजारांपासून दूर
ठेवतात. भारतात देखील जागतिक पातळीवरील ज्ञानसंपन्न आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिजिओथेरेपीस्ट
आहेत.
विश्वभरात
फिजिओथेरेपीचा उगम जरी १०० वर्षांपूर्वी झाला असला तरीही भारतात त्याला ६३ वर्ष
झाली आहेत. १९५३ मध्ये मुंबईच्या के.ई.एम. रुग्णायालामध्ये भारतातील पहिले फिजिओथेरेपी
कॉलेज सुरु झाले होते. आज भारतभर फिजिओथेरेपीच्या ३०० हून अधिक शिक्षण संस्था
आहेत. आपल्या देशात फिजिओथेरेपी शिकण्यासाठी १२वी विज्ञानानंतरचा यु.जी.सी. आणि
भारत सरकार आखीत ४ १/२ वर्षाचा फिजिओथेरेपी स्नातक (बी.पी.टी.) कोर्स आहे ज्यात
शरीर रचना, शरीर क्रिया, शरीर कार्य, शस्त्रक्रिया, औषधशास्त्र, स्त्रीरोग आणि
प्रसूती शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, बालरोग शास्त्र, मज्जातंतू शास्त्र, हृदयरोग
आणि श्वासनरोग शास्त्र आदी बरेच विषय असतात आणि या सर्व व्याधींवर कशा प्रकारे
फिजिओथेरेपीने उपाय करावे हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून आणि संशोधनातून शिकवलं जातं.
तसेच फिजिओथेरेपी मास्टर्स (एम.पी.टी.) चा २ वर्षांचा पद्विउत्तर कोर्स आहे ज्यात ओर्थोपेडीक,
न्युरोलोजी, कार्डीऑलॉजी आणि रेस्पीरेटरी, कम्युनिटी, स्पोर्ट्स फिजिओथेरेपी आदी
विषयांचा समावेश असतो. तसेच फिजिओथेरेपी मध्ये डॉक्टरेट (पी.एच.डी.) सुद्धा करता
येतं.
फिजिओथेरेपीस्ट
आपल्या आरोग्याची काळजी २ प्रकारे घेतात. १. आपल्याला काहीही आजार किव्वा दुखापत
होऊ नयेत म्हणून कशा प्रकारे काळजी घ्यावी, उत्तम स्वास्थ्यासाठी कोणकोणते, का आणि
कशे व्यायाम करावेत, आपल्या शरीराची आणि सर्व अवयवांची काळजी कशी घ्यावी याबद्दल
मार्गदर्शन करतात. २. किंबहुना काहीही इजा अथवा दुखापत झाल्यास ती कमी करण्यासाठी
कोणते उपाय करावेत, स्नायू बरे होण्यासाठी कोणते इलाज करावेत, आखडलेल्या
सांध्यांची कशी हालचाल करावी, शरीराची कार्यक्षमता कशी वाढवावी या सर्व
गोष्टींबद्दल माहिती देतात आणि इलाज देखील करतात.
खरच, फिजिओथेरेपी
म्हणजे २१व्या शतकाला मिळालेले एक वरदानच आहे. फिजिओथेरेपी मुळे आपल्याला नुसतेच
आपले आयुष्याच नव्हे, तर त्याची गुणवत्ता देखील सुधरवता येते आणि नुसतेच
आयुष्यातील वर्ष न वाढवता, त्या वर्षांमधील आयुष्य देखील जगता येतं.
फिजिओथेरेपीमधील प्रकार
फिजिओथेरेपीस्ट
आपल्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्यासाठी विविध शारीरिक व्याधींवर इलाज करतात. यात
प्रामुख्यानं हाडांसाठी, मेंदू आणि नासांसाठी (मज्जातंतू), हृदयासाठी, श्वासन आणि
फुफुसंच्या कार्यासाठी, खेळांमधील दुखापातींसाठी, लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी,
वर्धाक्यामधील त्रासांसाठी, काम करतांना होणाऱ्या त्रासांसाठी आणि सामाजिक
आरोग्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातात.
१. ओर्थोपेडीक फिजिओथेरेपी: ह्यात सांध्यांची आणि मणक्याची झीज, उदा.
संधिवात (आर्थ्रायटीस), स्पोंडीलायटीस, सायटिका, अपघात, सांधेरोपण, स्नायूंची आणि
तंतूंची दुखापत, फ्रोजन शोल्डर अशा बऱ्याच व्याधींवर इलाज करतात. सर्वप्रथम
रुग्णांचे दुखणे कमी करण्यासाठी विविध उपकरणांचा वापर केला जातो जेणेकरून रुग्ण
दुखणे विरहित दैनंदिन काम आणि व्यायाम करू शकतात. तसेच स्नायूंची ताकद
वाढवण्यासाठी आणि सांध्यांची हालचाल राखण्यासाठी देखरेखीखाली नियमित ताकद
वाढवण्याचे व्यायाम दिले जातात.
२. न्युरोलोजी फिजिओथेरेपी: ह्यात परालीसीस (अर्धांगवायू), अधरपक्ष्याघात,
पर्किंसंस, स्मृतीभ्रम, मेंदूंचे विकार, सेरीब्रल पाल्सी, नसंचे विकार, अशा बऱ्याच
व्याधींवर फिजिओथेरेपीस्ट इलाज करतात. अशा रुग्णांना बऱ्याच वेळी आपलं शरीर किव्वा
त्याचा भाग हलवता येत नाही, अथवा हालचाल करण्यास त्रास होतो. या रुग्णांना
फिजिओथेरेपीस्ट हालचाल करण्यास मदत करतात. यासाठी ते बऱ्याच उच्च दर्जाच्या
नाविन्यपूर्ण प्रकारांचे तंत्र वापर करतात. यामध्ये शरीराच्या विविध भागांचा कसा
वापर करावा, स्नायूंचा कडकपणा कसा कमी करावा, कमजोर स्नायू कसे हलवावेत, कमजोर
स्नायुंना कसा आधार द्यावा या संबंधी मार्गदर्शन करतात.
३. कार्डीऑलॉजी आणि रेस्पीरेटरी फिजिओथेरेपी: हे फ़िजिओथेरपिस्ट हृदय
विकाराचा झटका, बायपास शस्त्रक्रिया, हृदयात छिद्र, दमा, श्वासनाचे विकार, अशा
बऱ्याच व्याधींवर फ़िजिओथेरपी द्वारे इलाज करतात. हे सर्व इलाज इतर डॉक्टरांच्या
औषधोपचारा बरोबर करावे लागतात. तसेच श्वास आणि फुफुसंच्या कार्यासाठी आय.सी.यु.
मध्ये आणि इतर वेळी देखील करण्याचे व्यायाम सांगितले जातात. या रुग्णांना
प्रामुख्याने श्वास (दम) लागण्याचा त्रास होतो. त्यामुळे या रुग्णांना श्वासावर
नियंत्रण ठेवण्याचे व्यायाम अत्यंत उपयोगी आहेत. याच बरोबर बर्गाड्यांची हालचालीचे
व्यायाम, हृदयाची आणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवण्याचे व्यायाम, उच्च रक्तदाब
नियंत्रण करण्याचे व्यायाम शिकवले जातात.
४. स्पोर्ट्स फिजिओथेरेपी: यात खेळांमधील दुखापतींवर इलाज केले जातात.
तसेच खेळाडूंना दुखापती होऊ नयेत म्हणून उपाय योजना सांगून खेळाडूंना अधिक
कार्याक्ष्याम बनवले जाते. फ़िजिओथेरपिस्टचा क्रिकेट, भाला फेक, तबकडी फेक, शोर्ट
पट, तसेच ‘कॉनटेक स्पोर्ट्स’ जसे रग्बी, सायकल, डायविंग, स्केटिंग, फुटबॉल, हॉकी,
धावण्याची शर्यत, रेकेट स्पोर्ट्स, खोखो, कब्बडी अशा बऱ्याच खेळांमधे समावेश असतो.
हाड मोडणे, सांधा निखळणे/ निसटणे आणि स्नायूंना (मास-पेशी, तंतू) सूज येणे किव्वा
ते फाटणे या सर्व दुखापतींवर ते डॉक्टरांच्या बरोबर इलाज करतात. क्रीडाप्रकार आणि
तीव्रतेनुसार खांदा, मनगट, हात, खुबा, गुडघा, घोटा आणि मणक्याला इजा होऊ शकते.
स्पोर्ट्स फिजिओथेरेपीस्ट खेळाडूंच्या फिटनेस वर अधिक भर देतात ज्यात ताकद,
स्टेमीना, लवचिकता आणि कौशल्य महत्वाचे घटक आहेत.
५. कम्युनिटी फिजिओथेरेपी: यात वार्धक्यातील त्रास, काम करतांना होणाऱ्या
त्रास, पसूती मधील त्रास आणि सामाजिक आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी उपाय सांगितले
जातात. तसेच गर्भावस्थेत करायचे व्यायाम, प्रसुतीनंतरचे व्यायाम, मधुमेह आणि
स्थुलतेसाठीचे व्यायाम, काम करण्याच्या योग्य पध्दती (अर्गोनोमिक्स) आदी बाबत
मार्गदर्शन केले जाते.
फिजिओथेरेपीमधील
उपचार पध्दती
आपले
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिजिओथेरेपीस्ट वेगवेगळ्या उपचार पद्दतींचा वापर करतात.
यात प्रामुख्याने व्यायाम आणि इलेक्ट्रिक उपकरणे यांचा समावेश असतो. तसेच सांध्यांची
कार्यक्षमता, स्नायूंची कार्यक्षमता, रोगनिदान आणि कार्यनिदानपद्धती वाढवण्यासाठी
बऱ्याच अत्याधुनिक उपचारपध्दती सुद्धा वापरतात.
१. व्यायाम: हृदयाची, फुफुसांची आणि स्नायूंची गती आणि शक्ती वाढवणाऱ्या
व्यायामाला एरोबिक व्यायाम म्हणतात. अशा व्यायामामध्ये हृदयाचे ठोके आणि श्वासाचे
प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले पाहिजे आणि ते २० ते ३० मिनीटे करायला हवं. अशा
व्यायामामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, म्हणजेच न थकता काम करता येण्याची शक्ती
वाढते.
ताकद म्हणजे कुठलीही क्रिया करण्याची स्थिती. ताकद वाढण्यासाठीच्या व्यायामाला
अनएरोबिक व्यायाम म्हणतात. ह्यात वजन उचलणे, बैठका, जोर, सूर्यनमस्कार, आदी
प्रकारांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या व्यायामामुळे आपण अनेक कामे सहजतेने करू
शकतो. ह्या व्यायामामुळे आपले स्नायू पिळदार व डौलदार दिसतात.
दुखापत न होता
आपल्या शरीराला कोणत्याही स्थितीत नेता येणे म्हणजेच लवचिकता. वयोमानाने व योग्य
व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. ह्यामुळे
आपल्याला इजा आणि दुखापत देखील होऊ शकते. लवचिकता राखण्यासाठी स्नायूंना ताण
देण्याचे व्यायाम उपयुक्त आहेत.
चपळता म्हणजेच कुशलता. कोणत्याही प्रसंगी योग्य
आणि चटकन निर्णय घेणं. ह्यासाठी ताकद व लवचिकता ह्या दोघांची सांगड घालणे महत्वाची
ठरते. स्थिरता व योग्य शरीर ठेवण म्हणजे सध्या स्तीतीत शरीराचे तोल सांभाळता येणे.
फिजिओथेरेपीस्ट हे सर्व व्यायाम प्रकार रुग्णांकडून गरजेनुसार करून घेतात आणि
त्यांचे आरोग्य आणि राहणीमान सुधारतात. या सर्व व्यायाम प्रकारांसाठी जिम बॉल,
स्टेबीलीटी ट्रेनर, थेरा-बेंड, थेरा-ट्युब्स, टेप, हस्तोपचार पद्धती
(मेनुअल थेरेपी) आणि ओर्थोसीस यांचा वापर केला जातो.
२. इलेक्ट्रिक
उपकरणे: स्नायूंना आराम अथवा उत्तेजना मिळण्यासाठी, चालना मिळण्यासाठी, जखमा बऱ्या
होण्यासाठी किव्वा दुखणे कमी होण्यासाठी विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला
जातो. यात अल्ट्रासाऊंड थेरपी, डायथरमी, टेन्स, आय.एफ.टी., ट्रेक्षन, लेजर, इंफ्रा
रेड, विविध करंट ह्यांचा उपयोग केला जातो. अल्ट्रासाऊंड थेरपी, डायथरमी, लेजर आणि इंफ्रा
रेड हि प्रामुख्याने शेक देण्याची उपकरणे आहेत. हि उपकरणे दुखापत कमी करून त्या
भागाला लवकर बर होण्यास मदत करतात. टेन्स आणि
आय.एफ.टी. हे नसंचे दुखणे कमी करण्यास खूप उपयोगी आहेत. ट्रेक्षन हि उपचार
पध्दती मानेला अथवा कमरेला देता येते. हि उपचार पध्दती दुखणे कमी करण्यास आणि
स्नायूंची ताठरता कमी करण्यास मदत करते. विविध करंट चेतना नसलेल्या स्नायूंना
पुन्हा हालचाल करण्यास आणि त्यांची कार्यक्षमता राखण्यास मदत करतात.
३. मेनुअल
थेरेपी, निडलिंग, न्युरो टेकनिक आणि टेपिंग: या अत्याधुनिक उपचार पध्दती आहेत
ज्यामध्ये फिजिओथेरेपीस्ट त्यांच्या हातांचा, सुईचा, टेपचा आणि इतर अवजारांचा वापर
करून स्नायुंना आणि सांध्यांना चालना देऊ शकतात. तसेच या उपचार पद्दतींनी
ताठर्लेल्या स्नायूंना आणि मासपेशींना सुद्धा चालना देता येते.
आपल्या शरीराची निगा ठेवण्यासाठी प्रत्येक
अवयवांची देखील देखभाल खूप जरुरी आहे. आपल्या शरीरातील प्रमुख अवयव म्हणजे मेंदू,
हृदय, फुफुस, पोटातील अवयव, स्नायू, हाडे आणि सांधे. फिजिओथेरेपीस्ट या सर्व उपचार
पद्दतींचा वापर करून या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात.
व्यायामामुळे मेंदू ला उत्तम चालना मिळते, मस्तक व मनाला शांती आणि समाधान मिळत, हृदय
आणि फुफुसाची कार्यक्षमता वाढते, शरीरात रक्तभिसारण वाढते, थकवा जाणवत नाही, पोटातील
अवयव जसे जठर, आतड्या, मूत्रपिंड आदि यांचे विकार आणि निष्क्रीयता होत नाही, स्नायू,
हाडे आणि सांधे ह्यांच्या आरोग्य आणि ताकद, लवचिकता आणि चपळता उत्तम राहते.
आजच्या राहणीमानातील चुका आणि फिजिओथेरेपी
आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी
करतो. आपण सर्वजण मानतो की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकार विरहित आहोत.
मुळात स्वास्थ्य म्हणजे काय हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य
संस्था ह्यांच्या नुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक
स्वास्थ्या मध्ये नसून मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्वास्थ्या
मध्ये देखील आहे. केवळ आपल्याला काही आजार नाही म्हणून आपले स्वास्थ्य उत्तम आहे
असे म्हणून चालणार नाही.
आजच्या काळातील कित्येक आजार हे आपल्या
चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, संधीवात,
मानसिक ताण, कर्करोग, कंबरदुखी असे अनेक आजार आज सामान्य झाले आहेत. आपण त्यांना
आपल्या जीवनाचा घटक म्हणून मान्य देखील केले आहेत. पण खरी बाब ही आहे की हे सर्व
आजार पूर्णपणी रोख्ण्यासारखे आहेत ज्यासाठी फिजिओथेरेपी आणि व्यायाम
सर्वोत्तम गुरुमंत्र आहे. व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता व क्रियाशक्ती
वाढते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. जर देशातील प्रत्येक कुटुंब
स्वस्थ व निरोगी असेल तर नक्कीच आपल्या देशाची आर्थिक स्थिती देखील सुधारू शकेल.
व्यायाम हा स्वास्थ्याच्या रक्षणाचा उत्तम मंत्र आहे. पण व्यायाम म्हणजे काय?
आपल्या सर्वांमध्ये व्यायामाबद्दल बरेच समज/ गैरसमज आहेत. कोणतीही शारीरिक हालचाल
जी आपले स्वास्थ्य व आरोग्य सुधारते ती व्यायाम होय. आपले शारीरिक आरोग्य हे अनेक
घटकांनी बनलेले असते. पण ह्यामध्ये शरीराबरोबर मनाचे विकार देखील दूर व्हावेत हे
सर्वात महत्त्वाचे आहे.
पुढचा प्रश्न येतो की आम्हाला व्यायाम
करायला वेळ नाही, पैसा नाही आणि जागा देखील नाही!!!! पण खरं पाहता, व्यायामाला खरच
एवढा वेळ, पैसा आणि जागा लागत नाही. आपल्या देशातील ऋषी मुनि हे वर्षानुवर्ष
सूर्यनमस्कार करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचे. त्याच बरोबर त्यांचा आहार
देखील साधा होता व वागणुक देखील सोज्वळ होती. पतंजलीची सूत्र सांगतात की मनाची
शुद्धता फार महत्वाची असते. त्याच बरोबर सदवर्तन, चांगले चारित्र आणि चांगले विचार
देखील महत्वाचे आहेत. अशी अनेक योगासने आहेत जी ६ x ६ च्या खोलीत देखील करता
येतात. सूर्यनमस्कार एक असा परिपूर्ण व्यायाम आहे ज्याला काहीही वेळ आणि पैसा लागत
नाही. संशोधन सांगत की दिवसाला कमीत कमी १२ ते २४ सूर्यनमस्कार देखील आपल्या
आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे आहेत. जसं एखादा वैमानिक विमान उडवण्या आधी
विमानाचा प्रत्येक भाग तपासतो, तसेच आपण अंथरुणातून उठण्याआधी आपला प्रत्येक सांधा
जरी हलवून पहिला तरी एक उपयुक्त व्यायाम ठरतो.
पण आपली
आजची पिढी पाश्चात्य अनुकरणापायी आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. त्याच बरोबर
जगण्याची स्पर्धा, कामाच्या ताणामुळे अथवा संगतीमुळे व्यसनाकडे देखील वळत आहेत. हे
सर्व महत्वाचे प्रश्न मानवनिर्मित आहेत जे आज आपल्यालाच सोडवावे लागतील अन्यथा
आपल्या सर्वांच्याच आरोग्यावर ह्याचे दुष्परिणाम दिसतील. व्यायाम हे एक असे
सुव्यसन आहे ज्यामुळे आपण वाईट मार्गीदेखील कधीच जात नाही. आरोग्याच्या
दृष्टीने आज आपल्याला मॉल्स ऐवजी बागांची जास्त गरज आहे, प्रदूषणापेक्षा स्वच्छ
हवेची गरज आहे, औषधांपेक्षा व्यायामाची गरज आहे. नुसत्या आयुष्यापेक्षा सुंदर
जीवनाची गरज आहे. ह्यासाठी फिजिओथेरेपीस्ट च्या मार्गदर्शनाखाली विविध व्यायाम आणि
उपाययोजना शिकून आणि आजच्या जीवनशैलीतून होणारे बहुतेक से आजार रोखू शकतो आणि देशाला
प्रगतीच्या मार्गाकडे नेऊ शकतो.
डॉ. अपूर्व शिंपी
कम्युनिटी फिजिओथेरेपीस्ट (एम.पी.टी.),
प्राध्यापक आणि कम्युनिटी फ़िजिओथेरपी विभाग प्रमुख,
संचेती हॉस्पिटल, पुणे
फ़िजिओ वन केअर फिजिओथेरेपी क्लिनिक,
मित्र मंडळ चौक, पर्वती, पुणे