Saturday 21 June 2014

Health and Physical Fitness

स्वास्थ्य रक्षणाय

आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्वजण मानतो की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकार विरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्था (World Health Organisation) ह्यांच्या नुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्या मध्ये नसून मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्वास्थ्या मध्ये देखील आहे. केवळ आपल्याला काही आजार नाही म्हणून आपले स्वास्थ्य उत्तम आहे असे म्हणून चालणार नाही.

आता प्रश्न असा येतो की आम्ही तर सामान्य माणसे आहोत. आम्हाला ह्या सर्व गोष्टी करण्याची गरज का???
स्वास्थ्य रक्षणाय हा निसर्गाचाच नियम आहे. आपलं शरीर हे सर्वात उत्तम डॉक्टर आहे. पण त्या शरीराचं आरोग्य जोपासण्यासाठी आणि आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आणि किंबहुना देशाच्याच आरोग्य जपण्यासाठी आम्ही डॉक्टर्स बांधील आहोत. आजच्या काळातील कित्येक आजार हे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आहेत. मधुमेह, रक्तदाब, स्थूलता, संधीवात, मानसिक ताण, कर्करोग, कंबरदुखी असे अनेक आजार आज सामान्य झाले आहेत. आपण त्यांना आपल्या जीवनाचा घटक म्हणून मान्य देखील केले आहेत. पण खरी बाब ही आहे की हे सर्व आजार पूर्णपणी रोख्ण्यासारखे आहेत.
व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता व क्रियाशक्ती वाढते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. जर देशातील प्रत्येक कुटुंब स्वस्थ व निरोगी असेल तर नक्कीच आपल्या देशाची आर्थिक स्थिती देखील सुधारू शकेल.

व्यायाम हा स्वास्थ्याच्या रक्षणाचा उत्तम मंत्र आहे. पण व्यायाम म्हणजे काय? आपल्या सर्वांमध्ये व्यायामाबद्दल बरेच समज/ गैरसमज आहेत. कोणतीही शारीरिक हालचाल जी आपले स्वास्थ्य व आरोग्य सुधारते ती व्यायाम होय. आपले शारीरिक आरोग्य हे अनेक घटकांनी बनलेले असते. पण ह्यामध्ये शरीराबरोबर मनाचे विकार देखील दूर व्हावेत हे सर्वात महत्त्वाचे आहे.

जर आपल्याला वाटतं की आपली गाडी किंवा घरातील गोष्टी नीट असाव्यात तर त्यांची देखभाल जशी गरजेची आहे, तशीच आपल्या शरीराची निगा ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवांची देखील देखभाल खूप जरुरी आहे. आपल्या शरीरातील प्रमुख अवयव म्हणजे मेंदू, हृदय, फुफुस, पोटातील अवयव, स्नायू, हाडे आणि सांधे.

१.      मेंदू: ह्यात मस्तक व मनाचाही समावेष आहे. मनाची अशांती आणि असमाधान ह्या दोन गोष्टी मनाच्या विकारासाठी कारणीभूत असतात. ह्याच बरोबर अस्थिरता आणि ताणामुळे देखील मस्तकाचे विकार होऊ शकतात. मनाची शांती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी ध्यान आणि प्राणायाम अत्यंत महत्वाच्या आहेत. ध्यान म्हणजे शून्यावस्थेत जाणे. कसलाही विचार मनात न आणणे. ह्याच्या मुळे मेंदूला आराम मिळतो आणि त्याची कार्यशक्ती वाढते. प्राणायाम देखील मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्रिका, भ्रमरी, आग्निसार क्रिया, अश्विनी, बाह्य प्राणायाम, ओंकार असे अनेक प्रकार मेंदूच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहेत. प्राणायाम आपल्या मेंदूच्या प्रत्येक पेशी पर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करतो आणि आपले आयुरमान वाढवतो.

२.      हृदय आणि फुफुस: हृदयाची, फुफुसांची आणि स्नायूंची गती आणि शक्ती वाढवणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम म्हणतात. अशा व्यायामामध्ये हृदयाचे ठोके आणि श्वासाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले पाहिजे आणि ते २० ते ३० मिनीटे करायला हवं. अशा व्यायामामुळे शरीराची कार्यक्षमता (Stamina/ Endurance) वाढते, म्हणजेच न थकता काम करता येण्याची शक्ती वाढते. बर्याच लोकांची समजूत असते की रोजचं काम, घरकाम म्हणजेच व्यायाम. पण थकवा म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायामामुळे आपल्याला चेतना मिळते, आनंद वाटतो, कार्यक्षमता वाढते. शरीरात रक्तभिसारण वाढते. थकव्या मुळे ह्याच्या उलट परिस्थिती दिसते. धावणे, पोहोणे, सायकल चालवणे, योगासने, सूर्यनमस्कार, शाळेतील कवायती (PT Exercises) यामुळे आपली कार्यक्षमता वाढवता येते.

३.      पोटातील अवयव: ह्यात जठर, आतड्या, मूत्रपिंड आदि अवयवांचा समावेष होतो. बरेच विकार हे ह्या अवयवांच्या निष्क्रीये मुळे होतात. ह्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी सकस आणि योग्य आहार अत्यंत उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर पुरेसे पाणी, कॅल्शियम आणि विटामिन्स आवश्यक आहेत.

४.      स्नायू, हाडे आणि सांधे: ह्यांच्या आरोग्यासाठी ताकद (Strength), लवचिकता (Flexibility) आणि चपळता (Agility) चे व्यायाम महत्वाचे आहेत.
ताकद म्हणजे कुठलीही क्रिया करण्याची स्थिती. उदा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात वजन उचलण्याची, ढकलण्याची इत्यादी कामे करतो. अगदी कारवाल्यावर सुद्धा पंक्चर टायर बदलण्याची पाळी येऊ शकते. गरज पडल्यावर ती क्रिया करता येण्याची स्थिती म्हणजेच ताकद. ताकद वाढवण्यासाठी आपण व्यायाम शाळेत जाऊन अथवा घरी सुद्धा व्यायाम करू शकतो. अशा प्रकारच्या व्यायामाला अनएरोबिक व्यायाम म्हणतात. ह्यात वजन उचलणे, बैठका, जोर, सूर्यनमस्कार, आदी प्रकारांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या व्यायामामुळे आपण अनेक कामे सहजतेने करू शकतो. ह्या व्यायामामुळे आपले स्नायू पिळदार व डौलदार दिसतात.

दुखापत न होता आपल्या शरीराला कोणत्याही स्थितीत नेता येणे म्हणजेच लवचिकता. वयोमानाने व योग्य व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. ह्यामुळे आपल्याला इजा आणि दुखापत देखील होऊ शकते. लवचिकता राखण्यासाठी स्नायूंना ताण देण्याचे व्यायाम (Stretching exercises) उपयुक्त आहेत. ह्यासाठी योगासने फार महत्वाची आहेत. खास करून भुजंगासन, पस्चीमोत्तानासन, नौकासन, शलभासन, पवनमुक्तासन, वज्रासन, ताडासन, वीरभद्रासन, गोमुखासन, वीरासन, मर्कटासन, सूर्यनमस्कार आदी फार महत्वाचे आहेत.
चपळता (Agility) म्हणजेच कुशलता. कोणत्याही प्रसंगी योग्य आणि चटकन निर्णय घेणं. ह्यासाठी ताकद व लवचिकता ह्या दोघांची सांगड घालणे महत्वाची ठरते. आणि त्याच बरोबर गरज असते मानसिक शांती आणि चातुर्याची.

पुढचा प्रश्न येतो की आम्हाला व्यायाम करायला वेळ नाही, पैसा नाही आणि जागा देखील नाही!!!! पण खरं पाहता, व्यायामाला खरच एवढा वेळ, पैसा आणि जागा लागत नाही. आपल्या देशातील ऋषी मुनि हे वर्षानुवर्ष सूर्यनमस्कार करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचे. त्याच बरोबर त्यांचा आहार देखील साधा होता व वागणुक देखील सोज्वळ होती. पतंजलीची सूत्र सांगतात की मनाची शुद्धता फार महत्वाची असते. त्याच बरोबर सदवर्तन, चांगले चारित्र आणि चांगले विचार देखील महत्वाचे आहेत.

अशी अनेक योगासने आहेत जी ६ x ६ च्या खोलीत देखील करता येतात. सूर्यनमस्कार एक असा परिपूर्ण व्यायाम आहे ज्याला काहीही वेळ आणि पैसा लागत नाही. संशोधन सांगत की दिवसाला कमीत कमी १२ ते १५ सूर्यनमस्कार देखील आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे आहेत. जसं एखादा वैमानिक विमान उडवण्या आधी विमानाचा प्रत्येक भाग तपासतो, तसेच आपण अंथरुणातून उठण्याआधी आपला प्रत्येक सांधा जरी हलवून पहिला तरी एक उपयुक्त व्यायाम ठरतो.

पण आपली आजची पिढी पाश्चात्य अनुकरणापायी आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. त्याच बरोबर जगण्याची स्पर्धा, कामाच्या ताणामुळे अथवा संगतीमुळे व्यसनाकडे देखील वळत आहेत. हे सर्व महत्वाचे प्रश्न मानवनिर्मित आहेत जे आज आपल्यालाच सोडवावे लागतील अन्यथा आपल्या सर्वांच्याच आरोग्यावर ह्याचे दुष्परिणाम दिसतील. व्यायाम हे एक असे सुव्यसन आहे ज्यामुळे आपण वाईट मार्गीदेखील कधीच जात नाही.

आरोग्याच्या दृष्टीने आज आपल्याला मॉल्स ऐवजी बागांची जास्त गरज आहे, प्रदूषणापेक्षा स्वच्छ हवेची गरज आहे, औषधांपेक्षा व्यायामाची गरज आहे. नुसत्या आयुष्यापेक्षा सुंदर जीवनाची गरज आहे. म्हणूनच गोष्टीतला ससा कितीही उड्या मारत असला तरी तो व्यायाम न करता त्याच्या आरोग्याला केवळ थकवा देत होता. त्यापेक्षा कासवा सारखी निश्चयी प्रवृत्ती, एकाग्रता आणि कामाचा ध्यास जर आपण जोपासला, तर आपण देखील निश्चित त्यासारखे १०० वर्ष सुखी आणि निरोगी जगू. 

Dr. KH Sancheti
Dr. Apurv Shimpi (PT)

No comments:

Post a Comment