Sunday 22 June 2014

Old Age - Boon or Bane

वार्धक्य – शाप का वरदान


आयुष्यातील सेकण्ड इंनिंग खूप महत्वाची असते. आपल्या जीवनातील स्वतःसाठी सर्वाधिक वेळ आपण ह्याच वेळी देऊ शकतो. पण ह्या उतार वयातच आरोग्याचे सर्वाधिक त्रास देखील सुरु होतात. आपण कमावलेली सर्व शक्ती, धन व आरोग्य ह्या वेळी कमी होऊ लागते.

वाढत्या वयामध्ये शरीरात अनेक बदल होत असतात. वार्धक्या मध्ये आपल्या हाडांची वा सांधांची झीज होऊ लागते. हाडे ठिसूळ होऊन त्यामधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. ह्याच बरोबर स्नायू व तंतू ताठरतात जेणेकरून त्यांना इजा होऊ शकते. त्याच बरोबर हृदय, नसा व फुफुसं देखील कमजोर होतात. हे सर्व बदल अनिवार्य आहेत. जशी जुन्या कार ला सर्विसिंग जास्त लागते, तशीच जुन्या झालेल्या शरीराला देखील मेंटेनन्स जास्त लागतं. योग्य आहार, विचार व जीवन शैली मुळे ह्याचे प्रमाण कमी करता येतं.

तब्येतीचे बरेच त्रास वार्धक्या मध्येच दिसतात कारण आपण कामातून निवृत्ती घेतो. कामाची सवय असणाऱ्या शरीराची हालचाल व गती कमी करतो. निवृत्तीचा खरा अर्थ म्हणजे कामातील बदल होय. पण दुर्दैवाने आपण निवृत्ती म्हणजे आराम असाच समझ करून घेतो जेणेकरून आरोग्य कमी होत जातं. वार्धक्याची तयारी ही पन्नाशीच्या आधी करायला हवी. आपल्या शरीराच्या  बँकची पुंजी तरुण वयातच वाढवायला हवी. म्हणूनच जो पर्यंत तुम्ही कामं करता तो पर्यंत तुम्ही सशक्त व निरोगी राहता.

वार्धक्या मधील होणारा सर्वात मोठा त्रास म्हणजे हाडांचे फ्राक्चर. ठिसूळ झालेली हाडे ही लवकर तुटू शकतात. जरा देखील जोर, मार किवा इजा ते सहन करू शकत नाहीत. याशिवाय वार्धक्या मध्ये तोल (Balance) कमी होत जातो. त्यामुळे पडून हाडांचे फ्राक्चर चे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारे खुब्याचे हाड मोडलेले अनेक पेशंट हॉस्पिटल मधे येतात. खास करून बाथरूम मध्ये पाण्यावर घसरून पडण्याचे प्रमाण जास्त असते. काही लोकं कमोडवर बसतांना पाय घसरून पडतात व त्यांना इजा होते. आशा वेळी बाथरूम ची कडी लावली असल्यास कोणाची तत्परतेने मदत देखील घेता येत नाही. म्हणून जर तुम्ही घरात एकटे राहत असाल किवा केवळ आपला बायको/ नवऱ्या बरोबर असाल तर शक्यतो बाथरूम ची कडी न लावलेलीच बरी. जर बाथरूमच्या दारावरील हंड्ल जवळ अंधुक काच (Frosted Glass) लावली असेल तरी ती तोडून तातडीने मदत करता येईल. त्याच बरोबर कमोड शेजारी स्टील/ लोखंडी बार लावल्यास त्यांना धरून बसता / उठता येतं. 
जर डोळ्यांचा त्रास असेल तर चष्मा लावून वावरणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर घरात पुरेसा उजेड असणे देखील आवश्यक आहे. खास करून जर रात्री उठाव लागत असेल तर जमिनीच्या पातळी वर दिवे बसवा जेणेकरून तोंडावर उजेड येणार नाही पण अंधारात चालता येईल. ह्याखेरीज कायम एक टोर्च जवळ ठेवावी.

पडून इजा होण्यासाठी जी दुसरी गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे जिने. जिन्यावरून पडून, पाय मुरगळून इजा होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. ह्यासाठी जिन्याला देखील स्टील/ लोखंडी बार लावल्यास त्यांना धरून चढता/ उतरता येते. ह्याच बरोबर गरज पडल्यास काठी, वाकर, योग्य चपला वापराव्या. घरात कार्पेट वा उंबरठ्या वरून अडखळून पडण्याची भीती असते म्हणून शक्यतो ह्या गोष्टी घरात नाही ह्याची काळजी घ्यावी. जर नवीन घरात जाणार असाल तर सर्व खोल्या एकाच उंचीवर (equal level) आहेत हे तपासून घ्यावं.



नैराश्य हा वार्धक्यातील अटळ भाग व सर्वात मोठा शत्रू आहे. ह्याची करणे जरी अनेक असली तरी ह्याचा होणारा दुष्परिणाम अटळ आहे. ह्यामुळे आपल्या शरीरावर, मनावर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अनेक आहेत. म्हणून नैराश्या पासून जितकं लांब राहता येईल तितकं चांगलं. ह्याचा सर्वात चांगला मंत्र म्हणजे कधीही एकट राहू नका व चांगली मानसिकता ठेवा. मित्र मंडळी, किव्वा कुठल्या जोपासलेल्या आवडीत मन रमवावे. आपण जेवढे कामात गुंतलेलो राहू तितकाच आरोग्य चांगलं राहील. खास करून नातवंडानबरोबर खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो ज्याने मनाला फार हालके वाटते. उतारवयात सत्तात्याग करावा व कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेऊ नये. घराचा प्रमुख आपण नसून आपले पाल्य आहे हे मानावे. त्यांना प्रोत्साहन द्यावे, त्यांचे कौतुक करावे. सासू/ सासरे गिरी करू नये. दुसऱ्याच्या मनाचा विचार करा आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. विरंगुळा होईल त्यात मन रमवावे. स्वतःची आड्गळ वाटू देऊ नका. सारख्या जुन्या आठवणी काढून भूतकाळात राहू नका आणि पुढचा पिढीला मागे खेचू नका. भविस्शाची वाटचाल करा. ह्याच बरोबर योग्य आर्थिक नियोजन करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.



व्यायाम हे वार्धक्यामधील उत्कृष्ठ औषध आहे. ह्या वयात साधारणत: दोन प्रकार चे व्यायाम करता येतात. १. स्थिरता व योग्य शरीर ठेवण (Posture & Stability Exercises), २. स्नायूंचा हालचाली चे व्यायाम (Mobility Exercises). ह्यात योग, प्राणायाम व हाडांवर वजन येणारे व्यायाम (Weight Bearing Exercises) महत्वाचे आहेत. खास करून धनुरासन, भुजंगासन, सर्पासन, मकरासन, मर्कटासन, अर्धाशालाभासन, पावन मुक्तासन, अनुलोम – विलोम, कपालभाती, भ्रमरी हे महत्वाचे व्यायाम आहेत. सूर्यनमस्कार व शाळेत शिकवलेले व्यायाम (PT exercises) हे सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. ह्या मुळे हृदय, स्नायू, सांधे व मस्तक ह्याला परिपूर्ण व्यायाम मिळतो. व्यायामा बरोबर पुरेशी झोप देखील महत्वाची असते. बर्याच लोकंना योग्य झोप न मिळाल्या मुळे चिडचिड होते व आरोग्यावर दुष्परिणाम होतो. रात्रीचे जेवण ७ – ७.३० लाच करावे व जेवल्या नंतर २ – २.३० तासाने झोपावे जेणेकरून चांगली निद्रा लागते.



जर कंबर दुखी, मानदुखी, पाठदुखी, गुढ्घेदुखी असेल तर अस्थीरोगतज्ञांकडून कॅल्शियम, विटामिन डी 3, विटामिन बी 12, Anti-Oxidants, सोया प्रोटीन, विटामिन बी कॉम्प्लेक्स इत्यादी औषधे घावीत. जर हाडे ठिसूळ झाली असतील तर सकाळचा कोवळ्या उन्हात व्यायाम करावा. सूर्य विटामिन डी चे उत्तम स्त्रोत आहे. ह्याच बरोबर भौतिकोपचारतज्ञांकडून नी ब्रेस, कंबरेचा ब्रेस (पट्टा) व योग्य व्यायाम शिकून घ्यावेत. खास करून गुढघ्या चे व मणक्या चे व्यायाम फार महत्वाचे आहेत. दिवसातून २ – ३ वेळा हे व्यायाम करावेत. शरीराच्या प्रत्येक सांध्याची हालचाल करावी व नियमित सर्व सांध्यांना तेल लावावं. तीळाच अथवा कोणतेही आयुर्वेदिक तेल ह्यासाठी उपयुक्त आहे. एखाद्या हास्य मंडळाचे सभासद व्हावे. हास्य हे सर्वात मोठे औषध आहे. म्हणूनच कायम हसा व सुखी राहा.

संसाराचा आघाडीवर आपण आता मागच्या खुर्चीवर आहोत हे जेव्हा आपण मान्य करतो व आपल्या अस्तित्वामुळे दुसर्याला आनंद देतो तोच क्षण मोलाचा ठरतो. जेव्हा आपल्याला ही बाब कळते व जेव्हा इतरांना आपण हवे हवेसे वाटतो तेव्हाच वार्धक्य हे वरदान ठरते.  

Dr. KH Sancheti
Dr. Apurv Shimpi (PT)

No comments:

Post a Comment