Thursday, 23 February 2017

Bone Care in the Reproductive Age: प्रजननक्षम वयात हाडांची काळजी

घरातील जवाबदारी स्वीकारल्यापासून गृहिणीला असंख्य कामे करावी लागतात. मात्र याच काळात हाडांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष्य होतं.

स्त्रीला शक्ती चे रूप मानतात. आई, भगिनी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती ते सिद्ध करते. या सर्वात कठीण नातं व काळ हा गृहिणीच्या स्वरूपाचा असतो. या काळात ती पती आणि मुलांकडे जास्त आणि स्वतःकडे सर्वात कमी लक्ष देते. परिणामी वाढते वय आणि जीवनशैलीचा तिच्या हाडांवर झालेला दुष्परिणाम दिसू लागतो. साधारणतः प्रजननक्षम वयात स्त्रियांच्या हाडातील रक्षण तिचे संप्रेरक (हॉरमोन्स) करतात. यात इस्ट्रोजनचा फार मोठा वाटा असतो. इस्ट्रोजन हाडांमधील कॅल्शियमची पातळी जोपासण्यास मदत करतो. अनियमित पाळीमुळे इस्ट्रोजनचे प्रमाण व हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते.


बर्याच गृहिणींचा गैरसमज असतो की घरातील कामे म्हणजेच व्यायाम. या कामांमुळे जरी थकवा जाणवत असला तरी हा व्यायाम नव्हे. म्हणूनच, गृहिणींना हाडे बळकट ठेवण्यासाठी योग्य आहार आणि उपयुक्त व्यायामाची गरज आहे. आजची स्त्री हि केवळ गृहिणी नसून नोकरी, व्यवसायही करते. ती सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते व कुटुंबाला हातभार लावते. यातच, अनियमित जीवनशैली व कामाचा ताण यानेही हाडांची झीज होते.


कामाच्या ठिकाणी प्रसन्न मानसिकता हि हाडांच्या देखभालीसाठी आवश्यक असते. या व्यतिरिक्त कामाच्या स्वरूपानुसार, खास करून आय.टी. क्षेत्रातील स्त्रियांमध्ये, चुकीच्या पद्दतीने बसणे, वाकणे, वजन उचलणे या गोष्टी दिसतात. यामुळे स्नायूंवर व मणक्यांवर जास्त ताण येतो व कंबरदुखी आणि अंगदुखी सुरु होते. आजकाल तपासणीसाठी येणाऱ्या बऱ्याच स्त्रियांमध्ये स्थूलता, कंबरदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, थकवा, पाळीचा त्रास (पी.सी.ओ.डी.) आणि अनियमता अश्या बऱ्याच तक्रारी दिसतात. तसेच त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन, केल्शियम व विटामिन डी ३ चे प्रमाणदेखील कमी मिळते.


ऑसटीओपोरोसीस, अर्थात हाडांचा ठीसुळपणा, सुद्धा या वयातील काळजीची बाब आहे. यात हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड कमी होऊन माणके कोसळू शकतात अथवा हाडे मोडू शकतात. यात पारंपारिक उपवासाबरोबरच निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व व्यायामाच्या अभावाचा भर पडतो. याच वयात स्त्री मातृत्वत सुद्धा प्रवाश करते. दुर्बल झालेल्या हाडांवर बाळाच्या पोषणाची जवाबदारी पडते. गर्भाशयात बाळाला पोषण आईच्या शरीरातून मिळते हे आपण जाणतोच. पण बाळाची हाडे सशक्त होण्यासाठी व त्यांची योग्य वाढ होण्यासाठी मातेच्या शरीरात कॅल्शियमची अतिशय आवश्यकता असते. खासकरून गरोदरपणातील शेवटच्या ३ महिन्यात बाळ प्रचंड प्रमाणात आईच्या शरीरातील कॅल्शियमवर अवलंबून असते, ज्यामुळे तिच्या हाडांची घनता आजून कमी होण्याची शक्यता असते.


सुदैवाने कॅल्शियमचा तुटवडा भरून काढता येतो. बाळाला स्तनपान करतांनाही आईच्या शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. या काळात स्त्रीच्या शरीरातील साधारणतः ३ ते ५ टक्के कॅल्शियमचा साठा कमी होतो. त्यासाठी गरोदरपणात आणि स्तनपानाच्या काळात स्त्रियांना रोज १००० ते १३०० मि. ग्रा. कॅल्शियमचे सेवन करणे गरजेचे आहे. हा कॅल्शियमचा पुरवठा भाज्या, दुध, दही, राजगिरा आदी अन्नातून आणि कॅल्शियम व विटामिन डी च्या औषधातून मिळू शकतो. पण हि औषधे आपल्या प्रसुतितज्ञ अथवा अस्थिरोगतज्ञ यांच्या सल्ह्यानेच घ्यावीत.


याचबरोबर शरीरासाठी योग्य व्यायाम देखील आवश्यक आहे. व्यायामाआभावी कॅल्शियम हाडांपर्यंत न जाता लाघवीमार्फत बाहेर फेकले जाऊ शकते. साधारणतः स्नायू बळकट करण्याचे व्यायाम हाडांनाही बळकट करतात. यात सोपी योगासने, सूर्यनमस्कार, चालणे, सायकल चालवणे असे बरेच व्यायाम उपयोगी आहेत. मात्र जर हाडांची घनता कमी असेल तर फ़िजिओथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करावेत. यात प्रामुख्याने हाडांवर जोर येणेरे व्यायाम (वेट बेअरिंग व्यायाम) घेण्यात येतात ज्यामध्ये मोठ्या स्नायूंची ताकद वाढवण्याचे व्यायाम देखील असतात. यात मानेचे, कमरेचे, हातांचे, पायांचे तसेच मूत्रपिंड आणि गर्भाशयाला आधार देणाऱ्या स्नायूंचे (पेल्विक फ्लोर) व्यायाम देखील दिले जातात ज्यामुळे हाडे पुन्हा बळकट होऊ शकतात. पेल्विक फ्लोर व्यायामाने अवेळी होणाऱ्या ओलाव्याच्या त्रासापासून देखील मुक्ती मिळू शकते. तसेच उतार वयात पिशवी निसटण्याच्या आदी त्रासापासून देखील मुक्ती मिळू शकते. याचबरोबर वजनावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. स्तुलतेमुळे पेल्विक फ्लोरचे, बीजकोशाचे, संप्रेरकांचे असे बरेच त्रास होऊ शकतात. उतार वयात यामुळेच कंबरेचे आणि गुढ्घ्याचे त्रास देखील होऊ शकतात. फ़िजिओथेरेपिस्ट आपल्याला स्तुलतेवर उपाय सांगतात व वजन नियंत्रित करण्याचे व्यायाम देखील करून घेतात. तसेच गरोदरपणात, प्रसुतीत आणि स्तनपानाच्या काळात शरीराची योग्य ठेवण याबद्दल भौतिकोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन देखील दिले जाते. खास करून स्तनपान करतांना, दुपटी बदलतांना किव्वा बाळाला धरतांना आईने स्वतःची देखील कशी काळजी घ्यावी याबद्दल देखील मार्गदर्शन केले जाते.



या सर्व गोष्टींसोबत बसण्याची व कामे करण्याची योग्य पध्दती (एर्गोनोमिक्स), चांगली मानसिकता (पॉसिटीव विचारधारणा), ताणाचे (स्ट्रेस) नियोजन या सर्व गोष्टी देखील हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थाने ‘शक्ती’ बनण्यासाठी स्त्रियांना कुटुंबासोबत स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करणेही महत्वाचे आहे.

1 comment:

  1. Superb...I always find difficulty while educating a lay man..especially with the appropriate words in local language.. This article is of great help.

    ReplyDelete